गावाकडच्या दिवाळीचे अनोखे सांस्कृतिक अन् सामाजिक रंग

 

माझं बालपण खेड्यातच गेलं. निसर्गाच्या छटा, सणवार, थोरामोठ्यांच्या गोष्टी, गावखेड्याच्या छोटमोठ्या घडामोडींनी हे बालपण समृद्ध झालं. श्रावण संपला की, गावाकडं खरिपाच्या पिकाची छोटी छोटी खळी चालू व्हायची. मुग उडदाच्या राशी घरात यायच्या आणि मग त्याच राना रब्बीची पेरणी सुरू व्हायची. आभाळ निरभ्र दिसायला लागायचं की समजायचं दिवाळी आली. माझी आत्या सांगायची, 'दसऱ्यानंतर बरोबर वीस दिवसांनी दिवाळी येते.रानातल्या कामाची घाई असायचीसर्वदूर पसरलेली हिरवाईबांधा बांधावर वाढलेला जनावरांचा चारानुकतंच  रब्बी पिकानं डोकं वर काढलेलं असायचं आणि आम्हा बालमंडळींना वेध लागायचे ते कधी एकदा सहामाही परीक्षेचा पेपर होतो आणि आम्ही कधी एकदा गावाकडे जातो. गावातला प्रत्येकजण दिवाळीच्या खरेदीसाठी पैसे जमवायचा. कारण हा एकमेव मोठा सण त्यांच्या आयुष्यात दरवर्षी यायचा. नवनवे कपडेफराळ-फटाके यांच्या पलीकडे ते काहीच नसायचंपरंतुआनंद मात्र ओसंडून व्हायचा. मला आठवते ती माझ्या लहानपणीची गावाकडची दिवाळी. दिवाळीत स्वयंपाक खूप असणार मग आमची आत्या गड्याला सांगायची, 'ढलपीची लाकडं फोड म्हणजे स्वयंपाक लवकर उरकतो.' तो  गाडी भरून ढलप्या काढायचा आणि मुलांच्या मदतीने त्या स्वयंपाक घरात लावून घ्यायचा. इकडे गावातल्या घराघरात दसऱ्यापासूनच रात्री जात्याची घरघर ऐकायला यायची .तेव्हा रवा, सोजी, मैदा कुणीच विकत आणत नव्हते. दसऱ्यानंतर गहू भीजत घालून त्यापासून दिवसभर काम करून रात्री महिला रवा, सोजी काढायच्या आणि जात्यावरच्या ओव्यामधून त्यांचा हे दळण खूप सहज होऊन जायचं. आम्ही मुलं जात्याजवळ बसायचो आणि अक्कीकडं आमच्या  नावानं ओवी गाऊन दाखवण्याचा हट्ट धरून बसायचो. मग त्या हक्कापोटी अक्का गाऊ लागायची....

'बहीण ग भावंडाची आत पोटामध्ये माया

फोडलं ग सीताफळ आत साखरेची काया।।

या ओवीचा अर्थ काही तितका समजायचा नाही. पण, आपल्यासाठी ओवी म्हटल्याचं खूप भारी वाटायचं. फराळला लागणारी सर्व साहित्य घरी बनवण्याची पद्धत होती. चकलीचे पीठ, अनारसा पीठ हे सगळं घरी बनवलं जायचं. वडील घाण्यावर जाऊन तेल काढून आणायचे. शेतात पिकलेल्या करडी ,शेंगदाणे बैलगाडीत टाकून आम्ही त्यांच्यासोबत त्या घाण्यावर जायचो. तेलासोबत त्यांच्यापासून जनावरांसाठी पेंडपण घेऊन यायचो. पुरणपोळीशिवाय आपल्याला दिवाळीत वेगवेगळे पदार्थ खायला मिळणार म्हणून आम्ही भावंड खूप खुष असायचो.

देवळाच्या मागून थंडी गावात शिरलेली असायची. छोट्या शेकोट्या पेटून लोक त्याची ऊब घेत चौकात, घराच्या ओसरीत बसलेले असायचे. घराघरातून मुरळी निघायचा तो आपल्या बहिणीला सासरवरुन माहेरी घेऊन येण्यासाठी. बैलगाडी, सायकल ,क्वचित एखादी टू व्हीलर असायची. त्याकाळी चार चाकी बघायला मिळणे म्हणजे आमचे भाग्यच. रस्त्यानं त्यावेळी बैलगाड्याच जास्त दिसायच्या. मामासोबत भाचा आणि माहेरला  येणाऱ्या बहिणी रस्तोरस्ती  दिसू लागायच्या.

आमचा वाडा मोठा होता. त्याला भक्कम असलेले दरवाजे किल्ल्याच्या दारांप्रमाणेच वाटायचे. त्यावर पिंपळपणाची डिझाईनअन् दरवाज्याच्या दोन्ही बाजूनं दगडी देवळी होत्या. बाहेरून चिरेबंदी भिंती होत्या. देवळीत दिवाळी ते कार्तिक एकादशीपर्यंत आम्ही नित्यनेमानं दिवे लावायचो. वाड्यात दोन्ही बाजूनं ढाळजा होत्या. एक पाहुण्यांसाठी तर दुसरी धान्यांच्या पोत्यांनी भरून जायची. अंगणात दगडी फरशी असायची अन् दोन्ही बाजूंनी जोतं होतं. मधल्या भागात धान्याचे पेव असायचं. चौकावरील दोन्ही बाजूंनी पत्रे टाकलेलं होतं.एक भाग उघडा होतातिथे आमची खंडीभर जनावरं बांधलेली असायची. वाड्यात एकीकडे माणसांचा गोतावळी तर दुसरीकडे जनावरांचाही गोठा होता. दुसऱ्या बाजूनं बंदिस्त पत्राच्या भागात धान्याची पोती भरलेली असायची. दोन ओसरीवजा भागात आतून दोन, दोन खोल्या असे पन्नास पत्रे आणि चाळीस खाणाचं माळवद होतं. माणसं, जनावरं, धनधान्य अन् बालगोपालांच्या किलबिलाटानं गजबजलेला हा आमचा वाडा. आंघोळीसाठी स्वतंत्र पत्र्याचे न्हानीघर होते. तेथेच पाण्याची चूल आणि न्हानीघराला लागून दोन रांजणहोती. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारसेचा. शेती करणाऱ्या प्रत्येकालाच या दिवसाचे महत्त्व असायचं. आमच्या वाड्यात यादिवशी सगळ्या गाई म्हशींना ओवाळून गाणी म्हणायचा मोठा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी ७ वाजता सुरू झालेला कार्यक्रम कधी कधी दोन-दोन तास चालायचा. 

'दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी

गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या."

या ओळी मोठमोठ्यानं गायल्या जायच्या. या ओवीतला लक्ष्मण कोण हे अजुनही कळालेले नाही. वसुबारसेनंतर धनत्रयोदशी. धनत्रयोदशीला गावातला वसंत कोळी सगळ्यांच्या घरी पाणी भरून ठेवायचा. आमची आत्या त्याला 'वसंता' म्हणायची. त्याच्या पत्नीचं नाव अनुसया पण सारं गाव तिला 'अंशी'च म्हणायचं. अनुसया क्का दिसायला काळीसावळी नाकीडोळी नीट होती. पायात मोठमोठे तोडे घालायची. काष्टा साडी नेसायची. वसंतासोबत म्हशीवर पखाल टाकून सगळ्यांच्या घरी रांजण भरले जायचे.गावालगत नदी वाहत असल्यामुळे पखालीतून एकदम आठ-दहा घागरी पाणी आणलं जायचंत्याबदल्यात त्यांना शेतात पिकलेलं धान्य आणि दिवाळीचा फराळ देण्याची प्रथा होती. नरक चतुर्थीच्या पहाटेच्या अंघोळीसाठी हे पाणी आदल्या दिवशी भरले जायचे.म्हणून त्या दिवसाला 'गावात पाणी भरायचा दिवस' म्हटलं जायचं.  नरक चतुर्दशी म्हणजे पहिली अंघोळ. लवकर उठायचं म्हणून लवकर झोपावं लगे. मधेच रात्री जागा ली तर  दिसायचं कीदिवाळीचा फराळ करण्यात मोठ्या बहिणींचं जागरण सुरूच असायचं. तिळाच्या करंज्या, डाळीच्या पिठापासून शेव करून त्याच्यापासून बांधलेले डाळीचे लाडू, चकली, अनारसे, गोडी शेव, खारी शेव, चिवडा हे त्यातले प्रमुख पदार्थ. आमचे वडील प्रत्येक दिवाळीला एक मोठी करंडी भरून केळीचे घड घेऊन यायचे. ती केळी संपूर्ण दिवाळीभर पुरायची. 

पहिल्या अंघोळीच्या दिवशी पहाटे तीन ते चार वाजता गावातीलनहाव्याचे अण्णा दार वाजवत आमच्या वडिलांना उठवायचे. ते मगघरातील सर्व पुरुषमंडळीची पीठाने मालिश करायचे. चुलवानावर मोठा हंडा भरून पाणी  तापवलेलं असायचं. बहीण भावाला अंघोळ घालायची. अर्ध्यावर आंघोळ आली कीआत्या सांगायची 'पिठाचे दिवे आणि मुटक्याने ओवाळणी करा.' अंघोळ थांबवून भावनाकुडकुडत ठेवत ओवाळलं जायचं. गावात पहिली आंघोळ कोण करतो आणि कोण पहिले फटाकडी वाजवतोयाची जणू स्पर्धाच लागलेली असायची.

तेरखेडा या गावात फटाक्याची फॅक्टरी असायची तेथून तेरखेडा तोटा आणला जायचा. सुतळी बॉम्ब, कावळा, फुल बाजा,भुईचक्कर, लक्ष्मी तोटा अशी फटाक्यांची वाटणी व्हायची. त्याच दिवशी आमची त्रिवेणी मांगिनी आमच्या वडिलांना ओवाळण्यासाठी  यायची. एका मोठ्या ताटात झाडू, पान, सुपारी, खोबरे, खारका घेऊन ती ओवाळायची. त्या दिवशी तिचा मान असायचातिला ओवाळणी म्हणून दरवर्षी वडील इरकल साडी टाकायचे. आठवडाभर शेजारच्या गावचा परीट कपडे धुण्यासाठी येत असे. तर त्तर, हळदी कुंकू घेऊन अत्तरीन मावशीही यायची. बांगड्या भरण्यासाठी कासाराचा गावात किमान दोन-दिवस तरी मुक्काम असायचा.दिवाळी गावातल्या प्रत्येकासाठी असायची. सगळ्या बलुतेदारांना काम कसे मिळेलत्यांच्या घरी सणाचा आनंद कसा देता येईलहे जणू सगळं गावच ठरवायचं. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून गाई गुरांच्या गोठ्यात संपुर्ण शेणाचा गायवाडा आणि तटबंदी केली जायची. शेणाचीच  आत्याबाई आणि शेणाच्याच गवळणी,शेणाचेच पांडवशेणाचेच श्रीकृष्ण आणि पेंद्या असायचा. पेंद्या सगळ्या दिवाळीत आजारीच असायचा. त्याच्या बेबीत के वाजवण्यात वेगळीच मजा यायची. सडा, रांगोळी, गवळणी घालण्यात खूप वेळ जात असे. गवळणीच्या डोक्यावर आम्ही तरवडाची पिवळी फुले ठेवायचो. आमच्या एक लक्ष्मी भाभी होत्या त्यांच्या गवळणी तर खूप सुंदर असायच्या. गायीच्या शेणाचे महत्व काय आहेहे त्यावेळेस कळायचं .या गवळणीमध्ये एक दिवस नंदी महादेवाची यात्रा भरायची. तर एक दिवस गोवर्धन पूजा असायची. या गोवर्धन पूजेसाठी आम्ही उंच असा शेणाचा डोंगर बनवत असू.पाडव्याच्या दिवशी या शेणापासून आम्ही पांडव तयार करत. पाच पांडव, द्रौपदी, कुंती  आणि त्यांच्यामध्ये मग दूध उतू घालायची पद्धत आहे. ज्या बाजूला दूध उतू गेलं तिकडे खूपच पाऊस येईल असा समज असायचा.  अमावस्येच्या दिवशी वरण फळांचा बेत करून सर्वजन रानात गोवर्धन पूजा आणि पांडव पूजा करण्यासाठी जायचे. साधारणत: गुडघ्यापर्यंत आलेल्या गहू ज्वारीच्या पिकात दगडांचे पांडव उभे केले जायचे. त्यांना चुन्याच्या पाण्यानी रंगवले यचे.त्या पांडवांमध्ये पुन्हा दूध शेवाया टाकून दूध उतू घालायची पद्धत आजही आहे. वरणफळ आणि चपाती, पेंडपाला हे जेवण सगळेजण रानात करत असत. या वेळी प्रथम जेवणाचा मान मांगाला असयाचा. सोबत गोविंद मांगही आवर्जून उपस्थित राहायचा. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा दिवस.  भाऊबीजेला खंडीभर तळण काढलं जायचं. संपूर्ण दिवाळीत अनेकांच्या घरीफराळच्या पंगती व्हायच्या. नोकरीला बाहेर असलेले भाऊ या निमिताने गावाकडे यायचे. गावात एक दुसऱ्याला परकं समजलं जात नव्हतं. बहिण-भावाला ओवाळी काय देणार यावरून खूप रुसवा-फुगवा व्हायची. यावेळी नवीन आणलेल्या साडीवरून बहीणबहिणीत लुटुपुटुची भांडणं व्हायची. भाऊबीजेला नवीन करदुडा बांधण्याची पद्धत असायची. आई नवीन करदुडा बांधायची. पानसुपारी, खोबरे देऊन भाऊबीज संपायची. शेजारच्या गावात दिवाळीमधील चारही दिवस पडद्यावर चित्रपट दाखवले जायचे. चित्रपट बघण्याची खरं तर सर्वांना पर्वणीच असायची. हे चित्रपट बघण्यासाठी लोक अंधारातून रात्री चादरी पांघरून शेजारच्या गावात जात असत. हरिश्चंद्र, थांब लक्ष्मी कुंकू लावते, तुकाराम, असे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट दाखवले जायचे. त्यानंतर कितीतरी दिवस गावामध्ये त्या चित्रपटाची कथा एकमेकांना सांगून अनेक वेळा मनोरंजन व्हायचे. दिवाळीच्या दिवसात आमच्या घरी केसर नावाची गोंड समाजाची एक बाई यायचीआमच्या वडिलांना मोठमोठ्याने हाका मारायची 'ए वसंतामाझ्यामुळे तुझं गाव शाबूत आहे.असं  सांगून दिवाळी घेऊन जायची. कुंभाराच्या हाताला काम मिळायचंते पणत्या बनवून घरोघरी पाठवायचे. सगळेजण एकमेकांना फार पूरक असायचे. पैशांमध्ये खरं तर तेव्हा कोणाचाही व्यवहार नसायचा.विश्वास, प्रेम आणि गावातल्या एकीवर सगळं चालायचं. दिवाळी संपायची ती कार्तिक एकादशीलापंढरपूरच्या वारीत जाऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन मग तुळशीचे लग्न लावण्याची प्रथा असायची. शेतातला ऊस ,बोरे चिंच पूजेसाठी घेवून यायचं . तर बांगड्या, फनी,मंगळसूत्र तुळशीला वाहून मग मंगलाष्टिका व्हायच्या. फराळ करून तुळशीचे लग्न पार पाडायचे. आम्ही दुसऱ्या दिवशी तुळशीला घातलेल्या बांगड्या गोळा करण्यासाठी घराघरात जायचो सुंदर हिरव्या बांगड्या पोरी हातात घालायच्या. तेव्हा खरंच आनंद कशातही मिळत असे. कार्तिकी एकादशी झाली कीदिवाळी संपल्याचे द्योतक असायचे. कारणमाहेरी आलेली माहेरवाशीनसासरी निघायच्या त्यांच्या जाण्याबरोबरच दिवाळी संपल्याची हुरहुर लागायची.

 

 

डॉ. रेखा शेळके

प्राचार्य

एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय, औरंगाबाद

Comments

Popular Posts