संघर्षांनी 'रेखा'टलेली आयुष्याची वळणवाट!
कित्येकदा भूतकाळ आपल्याला एक नवी प्रेरणा देतो आपलं वर्तमान योग्यप्रकारे व्यतित करण्याची आणि उज्वल भविष्य घडवण्याची. भूतकाळातल्या अनेक गोष्टी, प्रसंग आठवले की डोळे आपोआपच पाणावतात. आपल्या आयुष्यातील भूतकाळातल्या वळणवाटांनी आपण हरखून जातो, भावनाविवश होऊन जातो. आज मला काहीसं तसंच झालंय. माझे डोळेही पाणावलेत आणि मी व्यथितही झाले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीहून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेलं बेलगाव हे माझं माहेर. दिडदोनशे उंबऱ्याचं आणि साधं किराणा दुकानही नसलेलं खेडंच ते. गावात चौथीपर्यंची शाळा. पाचवीपासून दुसऱ्या गावात किंवा मग थेट बार्शीलाच शिकायला जावे लागायचे. मुलींच्या शिक्षणाबाबत तर कमालीची उदासिनता. अख्ख्या गावातून एखादीच मुलगी नववी शिकलेली असेल. कित्येकींचे लग्न तर शिकत असतानाच झाले. माझ्या नशीबी ते आलं नाही हे माझं सुदैव. कदाचित याचं श्रेय कुटुंबीयांना आणि १९४८ मध्ये बार्शीत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कर्मवीर जगदाळे मामांना जातं. १९६८ मध्ये त्यांनी शिवाजी महाविद्यालयाची स्थापना केली. माझ्या जन्मापूर्वीच त्यांनी मुलींची बोर्डिंग सुरु केली आणि त्या बोर्डिंगच्या पहिल्या दोन विद्यार्थीनी होत्या लतिका कदम आणि शशीकला बोराडे. कदाचित तेव्हाच माझी आणि एमजीएमच्या ऋणानुबंधाची नाळ जुळली असावी. माझ्या गावात मात्र तोपर्यंतही एकही मुलगी पदवीधर झालेली नव्हती. माझी घरची स्थिती तशी सधनच. वडील शंभर एकर शेतीचे मालक. मात्र, मनाने वारकरी संप्रदायाचे. सधना-समृद्धतेसोबत त्यांच्यासोबत संस्कार करणारी ज्ञानेश्वरी होती. वडीलांचे मातृपितृछत्र बालपणीचे गेले. दोघेही प्लेगच्या साथीत हिरावल्या गेल्यानंतर बहिणीनेच त्यांचा सांभाळ केला. वयाच्या बाराव्या वर्षापासून भजन-किर्तन, मृदूंगवादन, ज्ञानेश्वरी वाचन, पंढरीची वारी हा अध्यात्मिक वारसा त्यांनी जपला. कदाचित या संस्कारानेच आम्हा दोघी बहिणींना पुढील शिक्षणासाठी वडिलांनी बार्शीला खोली किरायाने करून ठेवले होते. १९८० साली भाऊ लातूरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकायला गेला. बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या आम्ही दोघीच. तेव्हा गावातल्या इतर मुली आमची खूप टिंगलटवाळी करायच्या. शिकून बॅरिस्टर होणार का?, असा टोला लावायच्या. माझी बहिण खूप हुशार होती. तेव्हा तिला आणखी योग्य मार्गदर्शन मिळाले असते तर ती कदाचित डॉक्टर बनली असती. मात्र, तिने एम.एसस्सी केले आणि तिच्यापाठोपाठ मी इंग्रजी साहित्यात एम. ए. केले. १९९८ मध्ये लग्न झाले आणि नवऱ्यासोबत औरंगाबादला आले. नवऱ्याची दैनिक लोकपत्रमध्ये जेमतेम पगारावर नोकरी होती. इतक्या तुटपूंज्या पगारात घर भागत नव्हते. मात्र, दोघांमध्येही सुखी संसार करण्याची जिद्द होती. १९९८ मध्ये मी एमजीएममधून पत्रकारितेची पदवी पूर्ण करून एमजेला प्रवेश घेता. एकेदिवशी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अंकुशराव कदम सर महाविद्यालयात आले होते. मी त्यांना माझी ओळख करून दिली आणि मला नोकरीची गरज असल्याचेही सांगितले. सरांनी मला दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन भेटायला सांगितले. कदम सरांचे व्यक्तिमत्व, त्यांची कामाप्रतीची निष्ठा आणि सचोटी हे वेगळंच भावविश्व आहे जे मला नेहमीच आश्चर्यजनक वाटते. कदम सर मला तेव्हा एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसारखेच वाटायचे. कारण, त्यांच्या अवतीभवती लोकांचा मोठा गोतावळा असायचा. प्रत्येकजण त्यांच्याकडे काही ना काही समस्या घेऊनच येतो. मात्र, तेही एका जबाबदार कुटुंबप्रमुखांप्रमाणे प्रत्येकाच्या समस्येचे निराकरण करण्यामागे असतात. त्या दिवशी मी सकाळी १० वाजता त्यांच्या ऑफिसला पोहोचले. मात्र, त्यांच्याकडी आगंतुकांमुळे मला सायंकाळी ७ वाजेपर्यंत तिथेच बसून राहावे लागले. शेवटी ७ वाजता सर बाहेर आले आणि त्यांनी माझी विचारणा केली. असिस्टंट टू प्रिन्सिपल या पदावर मला दरमहा हजार रुपये पगाराची नोकरीही दिली. त्यानंतर वर्षभराने माझं पदव्यूत्तर शिक्षण (एमजे) पूर्ण झाले आणि मी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले होते. त्यामुळे मला त्याचवर्षी एमजीएममध्ये प्राध्यापक पदावर नियुक्त करण्यात आला. तेव्हा मला ४ हजार रुपये पगार होता. त्यामुळे माझ्या संसाराला मोठा हातभार लागला. दरम्यान, सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच महाविद्यालयाची प्राचार्य, प्राध्यापक पदासाठी जाहिरात आली. नवे प्राचार्य रूजू झाले. माझ्या ध्यानीमनी नसताना त्यांनी मला पात्र नसल्याचे कारण देत नोकरीवरून काढून टाकण्यात येत असल्याचे पत्र दिले. अचानक आलेले हे संकट माझ्यासाठी खूप वेदनादायी होते. मी कदम सरांकडे जाऊन विनवणी केली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा नवऱ्याला अवघे दोन हजार रुपये पगार होता. त्यामुळे आमच्यासमोर दयनीय परस्थितीचा जणू काळोखच माजला होता. मात्र, मला हार मानायची नव्हती. केवळ जगायचं नव्हतं तर संघर्षाला हरवायचं होतं. मग पुन्हा एकदा नोकरीसाठी पायपीट सुरू झाली. अनेक दैनिकांच्या कार्यालयाच्या घिरट्या घातल्या. मात्र, तिथेही निराशाच. मुलींनी दैनिकात काम करणे म्हणजे तेव्हा अत्यंत दुय्यम बाब. दरम्यान, आधीच्या नोकरीच्या पीएफच्या रकमेतून संसाराचा गाडा कसबसा ओढत होते. माहेरकडून दरमहा आर्थिक मदत, धनधान्य येत होते. परंतु, माझ्या मनाला ते पटत नव्हते. दरम्यान, दैनिक सकाळमध्ये महिला सदरासाठी काम करणाऱ्या दिंडे मॅडमनी मला एका उद्योजक महिलेची मुलाखत घेण्याचे काम दिले. त्यावरून मला उद्योजक महिलांसाठी 'उद्योगस्वामीनी' नावाने एक विशेषांक काढण्याची युक्ती सुचली. त्यासाठी सरकारी कार्यालयातून महिला उद्योजकांची नावे आणि त्यांचे पत्ते शोधून काढली. माझ्याकडे संपर्काची कोणतीही साधने नव्हती किंवा प्रवासासाठी साधी दुचाकीही नव्हती. त्यामुळे उद्योजक महिला आणि त्यांच्या कंपन्यांचा शोध घेण्यासाठी मला प्रचंड पायपीट करावी लागायची. चिकलठाण्यापासून पंढरपूर, रांजणगाव, वाळज हा संपूर्ण औद्योगिक भाग मी पायीच पिंजून काढायची. दरम्यान, महिलांच्या मुलाखती आणि त्यांच्याकडून जाहिराती घेणे, असा माझा उपक्रम सुरू होता. माझ्या लेखनामुळे २००२ मध्ये एका विशेषांकासाठी एका उद्योजकाने तर १२ हजारांची जाहिरात दिली होती. तेव्हा ही रक्कम खूप मोठी होती. तेव्हा एका अंकासाठी तब्बल दीड लाखांच्या जाहिराती मी जमवल्या होत्या. नोंदणी नसलेले विशेषांक, अत्यंत कमी खप, जास्त ओळख नाही किंवा कुणी गॉडफादरही नाही, अशा अत्यंत विषम परिस्थितीतही मी वाटचाल करत होते. 'मंजिले उन्हींको मिलती है जिनके सपनों में जान होती है| पंखों से कुछ नहीं होता..हौंसलोंसे उडान होती है|' या ओवींवर माझा ठाम विश्वास होता आणि मी त्या सिद्ध करत होते. दोन वर्षे मी नीरा देवकत्ते हिच्यासोबत मिळून उद्योगस्वामीनीचे अनेक अंक काढले. औरंगाबादेतून सुरू झालेला उद्योगस्वामीनीचा प्रवास मग मराठवाडाभर पसरला. कष्टाला पर्याय नसतो आणि पैशाचं सोंग करता येत नाही, हे वाडवडील म्हणायचे ते मला पटलंही होतं आणि मी ते अनुभवतही होते. पाठीशी केवळ कुटुंबीयांकडून मिळालेल्या संस्काराची शिदोरी आणि काहीही करून परिस्थितीला हरवण्याची जिद्द होती. दरम्यान, २००४ साली सईचा जन्म झाला आणि आयुष्याला वेगळे वळण आणि नवी ऊर्जा मिळाली. तिचा सांभाळ करायचा असल्याने उद्योगस्वामीनीचा अंक काढणे मला शक्य होत नव्हते. म्हणून पुन्हा एकदा कदम सरांकडे गेले. त्यांनी तीन हजारांवर लोकपत्रला उपसंपादकपदाची नोकरी दिली. रोजच्या कामासोबतच लोकपत्रमध्येही उद्योगस्वामीनीच्या धर्तीवर बाप-लेकी हा विशेषांक काढला. त्याला तब्बल आठ लाख रुपयांच्या जाहिराती मिळवल्या. विशेष म्हणजे, त्या अंकाच्या प्रकाशनाला सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या आणि यानिमित्ताने त्या प्रथमच औरंगाबादेत आल्या होत्या. २००४ ते २००७ दरम्यान लोकपत्रमध्ये मी उपसंपादक ते वृत्तसंपादक या पदांवर काम केले. २००७ साली रणजीत कक्कड सरांनी माझ्यावर लोकपत्रच्या औरंगाबाद शहराच्या आठ पानांची पूर्णवेळ जबाबदारी सोपवली. मी लोकपत्र कार्यालयाच्या जवळच राहायचे. त्यामुळे माझ्यासाठी घर आणि कार्यालय एकच झाले होते. दरम्यान, ५ सप्टेंबर २००७ साली मला कदम सरांचा फोन आला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी भेटण्यास बोलावले. हेसुद्धा माझ्यासाठी अकस्मातच होते. त्यामुळे आपल्याकडून काही चुकले तर नसावे ना, याची मला धास्ती वाटत होती. मी घाबरतच सरांकडे गेले. तेव्हा त्यांनी, "उद्यापासून तू एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे इनचार्ज प्राचार्य म्हणून काम करायचे', अशी आदेशवजा सूचना केली. मी सरांना मुद्दामच आठवून करून दिली की, "ज्या कारणासाठी तुम्ही मला नोकरीवरून काढले होते ती पात्रता अद्यापही माझ्याकडे नाही.' त्यावर सर थोडा संकोचले. मात्र, माझी पीएचडीसाठी नोंदणी झालेली असल्याने मी पात्र ठरू शकत होते. मी सरांना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. सरांनी लोकपत्रची नोकरी सोडायची नाही, अशी अटही टाकली होती. माझ्यासाठी त्यात वावगे काहीच नव्हते. संघर्षपूर्ण आयुष्य आणखी एक संधी देतोय, अशीच माझी भावना होती. मग, एक वेगळीच दिनचर्या सुरू झाली. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कॉलेज आणि सायंकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत लोकपत्र. संघर्ष आयुष्याशी, परिस्थितीशी सुरू होता. मात्र, यात माझ्या इवल्याशा बाळाचे हाल होत होते. ती एकप्रकारे आईविनाच होती. मात्र, त्यावेळी तिचा बापच तिची आई झाला होता. सई आणि घर दोघांनाही माझ्या नवऱ्याने एका बाईप्रमाणे सांभाळले. कदाचित नवरा इतका समजूतदार नसता तर मी आज काहीच नसते. म्हणूनच माझ्या नवऱ्याचा मला सदैव अभिमान वाटतो. २००९ मध्ये माझी पीएच.डी पूर्ण झाली आणि मी पूर्णवेळ प्राचार्य बनले. तसे ते काम २००७ पासूनच सुरू होते. दरम्यान, माझ्यासोबत लोकपत्रमध्ये काम करणारी माझी मैत्रिण आशा देशपांडेलाही महाविद्यालयात बोलावून घेतले. सुरुवातीला आम्ही दोघी आणि २० विद्यार्थी असा आमचा महाविद्यालयीन संसार होता. महाविद्यालय आणि लोकपत्र या धावपळीत वर्ष गेले आणि मग मी लोकपत्र सोडले. मात्र, आजही नाळ कायम आहे. कारण, संघर्षाच्या काळात पोटाची खळगी भरण्यास हातभार लावणाऱ्या त्या तमाम कामांमुळेच तर मी इथवर पोहोचू शकले. दरम्यान, एमजीएम जर्नालिझम कॉलेजचे विद्यार्थी देशातील सर्वच मीडिया हाऊसमध्ये कसे पोहोचतील, यासाठी मी स्वत:सोबतच नवा संघर्ष सुरू केला. विद्यार्थ्यांना सर्वंकष शिक्षण देण्यासोबतच दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये नेऊ लागले. अनेक वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे, जाहिरात संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी ठेवल्या. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांना महाविद्यालयात आमंत्रित करून विद्यार्थ्यांशी संवाद आयोजित केले. अवघ्या २० विद्यार्थीसंख्येपासून सुरू झालेल्या या महाविद्यालयात आता दरवर्षी ३०० विद्यार्थी शिकून उत्तम करिअर करतात. माझे कॉलेज आज खूप वेगळ्या वळणावर आहे. दोन कोर्सेसपासून सुरू झालेला प्रवास आता फिल्म, फोटोग्राफीचे स्वतंत्र विभाग तसेच स्वतंत्र रेडिओ स्टेशन सुरू करण्यापर्यंत पोहोचला आहे. सुसज्ज पायाभूत सुविधा, अद्ययावात स्टुडिओ, अत्यंत आधुनिक उपकरणे आणि त्यांचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे प्राध्यापक, तितक्याच जिज्ञासेने स्वत:चे आयुष्य घडवणारे आणि महाविद्यालयाचा नावलौकिक करणारे विद्यार्थी, इतका मोठा लवाजमा आज माझ्यासोबत आहे. इथून शिकलेले हजारो विद्यार्थी देशातील कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. अनेक नामांकित प्रसारमाध्यम, जाहिरातसंस्था, सरकारी विभागात उत्तम पगारांवर विद्यार्थी काम करत असल्याचा मला अभिमान वाटतो. हे सर्व सांगत असताना हा माझा एकटीचाच संघर्ष वाटत असला तरी या संपूर्ण प्रवासात मला साथ देणारे, मार्गदर्शन करणारे असंख्य हात आहेत. स्वत:च्या संघर्षाच्या वाटांनी मला यशाच्या वळणावर आणून ठेवले असले तरी हा मार्ग न थांबणारा, न संपणारा आहे, याची मला जाणीव आहे.
डॉ. रेखा शेळके
प्राचार्य
एमजीएम वृत्तपत्रविद्या
आणि जनसंवाद महाविद्यालय
औरंगाबाद

.jpeg)
मॅडम जवळपास रोज भेटतो, पण हे सर्व माहिती नव्हते तुम्हा उभयतांना मानाचा सलाम आणि शुभेच्छा.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteमॅडम जवळपास रोज भेटतो, पण हे सर्व माहिती नव्हते तुम्हा उभयतांना मानाचा सलाम आणि शुभेच्छा.
ReplyDeleteमॅडम खूपच छान रेखाटला य प्रवास.... सलाम तुमच्या जिद्दीला...
ReplyDelete2007 पासून मी जे पाहिले त्यालाच मी खडतर समजत होते मात्र तुमचा आधीचा प्रवास हा त्यापेक्षा अधिक खडतर होता. सलाम ..
ReplyDelete.