हस्तकलेचा वारसा जपणारे हेरिटेज व्हिलेज
एका संशोधन परिषदेच्या निमित्ताने
काही सहकाऱ्यांसमवेत ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला गेले होते. रात्रीचे दहा वाजले होते. विमानतळावर
उतरताच मनात ओडिशातील निसर्गसौंदर्याचे पर्यटन करण्याविषयी विचारचक्र सुरू झाले होते. सोबतच्या सहकाऱ्यांशी याबाबत गप्पा सुरू असतानाच आम्हाला विमानतळावरून गेस्ट
हाऊसला घेऊन जाणाऱ्या कारचा ड्रायव्हर म्हणाला, "पहाटे चार
वाजता घरातून बाहेर पडलात की तुम्हाला सुर्यमंदिरासोबत समुद्रातून उगवत्या सुर्याचेही
दर्शन होऊ शकेल.' समुद्रातून उगवत्या सुर्याच्या दर्शनाची ओढ
मनी बाळगून रात्री झोपी गेले अन् पहाटे पाच वाजता थेट समुद्रकाठी सुर्यनारायणाचे विहंगम
दर्शन घेण्यासाठी जाऊन पोहोचले. चहुबाजूंनी अथांग सागर,
खळाळून उसळणाऱ्या लाटा अन् तांबूसलेल्या रंगाचे पांघरून घेऊन दर्शन द्यायला
आलेला सूर्य. हे संपूर्ण दृश्य केवळ विहंगमच नव्हे तर आयुष्याला
एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा देणारे वाटले. भुवनेश्वरचे सौंदर्य खरंच मनात
डोळ्यांत साठवण्यासारखे आहे. चहुबाजूंनी निळाशार समुद्र. समुद्राच्या
काठावर इतिहासाची साथ देत उभे असलेले कोणार्कचे सूर्यमंदिर, इथली जगन्नाथाची रथयात्रा तर
सगळ्याच्या जिव्हाळयाचा विषय. कोणार्क मंदिरावरील कलाकूसर आणि अप्रतिम
कारागिरी मनी साठवून आम्ही
जगन्नाथपुरीमध्ये पोहोचलो. जगन्नाथांच्या पूर्वीपासून खूप आख्यायिका
ऐकल्या होत्या आणि त्याप्रतीचे आकर्षणही तितकेच होते. सोबतच, एका गावाविषयी आणि तिथल्या कलासंस्कृतीविषयीसुद्धा
प्रचंड ऐकले होते आणि कधी एकदाचे तिथे जातो, असे झाले होते.
पुरीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर वसलेलं रघूराजपूर नावाचं हे गाव.
गाव म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर साधारणपणे निसर्गाच्या
कुशीत दडलेलं किंवा प्राचीन संस्कृतीनं नटलेली वस्ती, असे चित्र
उमटते. रघूराजपुराच्या बाबतीत या वैशिष्ट्यांहून अधिक खूप काही
आहे. रघूराजपूर हे कलाकारांचं गाव म्हणून जगविख्यात आहे.
निसर्गातल्या अनंत रंगांनी, आकारांनी, काही कलावंतांच्या कुंचल्यांनी, काही सुरावटींनी अन्
सुरांनी सजलेलं विलक्षण असं हे गाव. नारळ आणि पामच्या दुतर्फा रांगातून
नागमोडी वळणवाटेतून आम्ही रघूराजपुरात पोहोचलो. गावच्या वेशीवरच राधामोहनचे
मंदिर. या मंदिरावरील अनोख्या कलाकृतीनं आम्ही केवळ भारावलोच
नाही तर हे एक आगळंवेगळं स्वागतही वाटलं. या मंदिराच्या पारावर
दोन माणसं गप्पा मारत बसले होते. त्यांनी आम्हाला बघितले आणि
कलाकारांच्या घरी येण्याचा आग्रह केला. तिकडे जात असताना आम्ही विचारले, ‘’तुम्ही काही काम नाही करत का?’’ ते म्हणाले, ‘’करतो की, कलाकूसर करणे हेच एक काम आहे आम्हाला.' भार्गवी नदीच्या काठावर वसलेलं हे
पंधराशे लोकवस्तीच्या दोन
रांगांमध्ये विभागलेलं हे खेडं. नारळाच्या घनदाट छायेत असलेली ही घरे
नव्हतीचं जणू काही चित्रकलेच्या सजीव देखाव्याचे कलादालनच.
हृदयाचा ठाव घेणाऱ्या बोलक्या भिंती
रघूराजपुर तसे पाहता आपल्याकडील
गावासारखेच गाव. कलेच्या माध्यमातून गावात आर्थिक सुबत्तता आली म्हणून
येथे बंगले बांधलेले दिसत नाही. येथील भिंतीही आपल्याकडील घरासारख्याच्य
आहेत. मात्र, त्या आपल्यापेक्षा खूप बोलक्या
वाटतात. कारण, प्रत्येक भिंतीवर चित्रे
रेखाटलेली आहेत. आपली पायवाट सुरू असतानाच आपल्यासोबत या भिंती
बोलत असल्याचा या वेळी भास होऊ लागतो. कधी कधी आपल्या डोळ्यादेखत
रामायण, महाभारत घडत असल्याचा साक्षात्कार या भिंती उभ्या करतात.
तर कधीकधी कृष्णाच्या रासलीला मनाला खिळवून ठेवतात. व्यक्तीचे अनेक गुण-अवगुण असतात. कित्येकदा नाहक अहंभाव असतो आणि कलाकारांच्या बाबतीतही ही बाब निराळी नसते.
मात्र, येथील प्रत्येक कलाकारांना हे सूत्र लागू
पडत नाही. कारण, ज्या पद्धतीने येथे ते
आपले स्वागत करतात ते पाहून आपण हरखून गेल्याशिवाय राहत नाही. या स्वागतात आगत्य, प्रेम, आपुलकी
दिसते.
सावली
झाडांची, सावली मायेची…
आगंतुकांना कथा सांगे कलाकारांची…
या ओळी या कलाकारांसाठी आणि
त्यांनी जपलेल्या कलेसाठी चपखल लागू पडतात. पाऊस, वारा, वादळ या अनेक अस्मानी संकटांवर मात
करुन उभा राहिलेल्या या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कलादालनात आम्ही प्रवेश केला. या गावाला हजारो वर्षांचा वारसा आणि
परंपरा आहे. आजही ही परंपरा
तितक्याच गांभीर्याने त्या पुढच्या
पिढीकडे पोहोचवण्यासाठी इथला प्रत्येक कलाकार कष्ट घेताना दिसतो.
केलूचरण महापात्रांची आणि पट्टचित्रांची जन्मभूमी
पारंपरिक नृत्य गोटीपुआची जन्मभूमीही
रघुराजपूरच आहे. गोटीपुआ हा अत्यंत प्राचीन आणि नावाजलेला लोककलाप्रकार
आहे. १५ व्या शतकात या लोकनृत्याचा अविष्कार झाला. या नृत्यप्रकारात एकमात्र पुरुष आणि उर्वरित स्त्रिया अशी रचना असते.
आख्यायिकेनुसार, पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण
आणि सर्व स्त्रिया म्हणजे गोपिका, अशी मान्यता आहे. जगन्नाथांच्या मंदिरात स्त्रियांऐवजी पुरुष नर्तकच स्त्रीवेशात नृत्य करायचे.
काहींच्या मते, ओडिसी नृत्यातून गोटीपुआ नृत्याचा
अविष्कार झाला. कारण, जगन्नाथ मंदिरातील
सेवादारांनी येथे या नृत्याचे प्रशिक्षण सुरू केले होते. तर काहींचे
मत याहून वेगळे आहे. त्यांच्या मते, आधी
गोटीपुआ नृत्याचा अविष्कार झाला आणि मग ओडिसी नृत्याचा उदय झाले. प्राचीन काळी प्रसिद्ध ओडिसी गुरु आणि नर्तक गोटीपुआचेच सादरीकरण करायचे.
त्यांनी मंदिराच्या बाहेरील भिंतीवर लावलेल्या अप्सरांच्या प्रतिमांनी
प्रभावित होऊन ओडिसी नृत्य करायला सुरुवात केली. ओडिसी
हे शास्त्रीय नृत्य जगभरात पोहचवणारे सुप्रसिद्ध नृत्यगुरु केलूचरण महापात्रा यांचा जन्म याच
रघुराजपूरमध्ये झाला. पदमविभूषण केलूचरण महापात्रा नृत्यासोबतच पट्टचित्र काढण्यातही अतिशय कुशल होते. केलूचरण यांचे
वडील उत्कृष्ट चित्रकार तसेच मृदंगवादक होते आणि आता केलूचरण यांचे चिरंजीव रतीकांत महापात्रा त्यांची नृत्य परंपरा
तितक्याच ताकदीने पुढे घेऊन जात आहेत. एखाद्या घरात
कलाकार जन्मला तर त्यांच्या पुढील पिढीकडेही तो वारसा आपसुकच येत असतो. रघुराजपुरात तर शास्त्रीय कलेतील महान नृत्यविशारद आणि पट्टचित्रकाराचा जन्म
झाला आहे. त्यामुळे येथील लोकांच्या रक्तातच ही कला वाहते.
ओडिशामधील अतिशय जुनी कला म्हणून पटटचित्र. पट्ट म्हणजे कॅनव्हॉस आणि यावर हातांनी
रेखाटलेली चित्रे म्हणजे पट्टचित्रकला. स्थानिक कलाकार जितेंद्र बेहरा यांनी आम्हाला
या प्रक्रियेबद्दल सांगितले, पट्टचित्राचा
कॅन्व्हास बनवण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि जिकरीची आहे. याला पर्याय म्हणून अनेक कलाकार पाम लिफचा वापर करतात. पाम लिफवर काही शब्द चितारण्यासाठी लोखंडी पेनाचा वापर केला जातो. एखाद्या बाळाचा जन्म झाला की, त्याची जन्म वेळ,
तारीख आणि एकंदरीत कुंडलीच या पेनाच्या सहाय्याने पामलिफवर लिहून ठेवली
जाते. पट्टचित्र कॅन्व्हाससाठी जुन्या
कॉटन साडया चिंचाच्या बियापासून ( चिंचुके ) बनवलेली गोंद
लावून एकमेकांना
चिकटवल्या जातात. त्यानंतर त्याच्यावर शाडूचा लेप दिला जातो. त्यापासून तयार
झालेल्या कापडावर रामायण,
महाभारत, जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या आख्यायिका तसेच अनेक प्राचीन घटना किंवा देवदेवतांच्या कथा चित्रात्मक
रुपात रेखाटल्या
जातात. रघुराजपूरचे या कलेप्रति वेगळेपण विलक्षण आहे. कारण, या गावातील १५० घरांपैकी कोणत्याच घरात तुम्हाला
एकसारखी डिझाइन दिसणार नाही. हे वैविध्यपण या कलाकृतीमागील सृजनशीलतेचे
द्योतक आहे. पटटचित्र
शिकण्यासाठी रघुराजपुरात
जगभरातून लोक येतात. येथील
लोकांकडून कला शिकतात आणि त्याचा प्रसारही करतात. गावातील चिमुकल्यांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकजण प्राचीन कलेचा
अभ्यास करताना दिसतो. पटटचित्राशिवाय ताडाच्या पानावर सुई-दोरा वापरुन
अनेक कलाकृती बनविल्या जातात. संपूर्ण पानावरील चित्र एकसारखे दिसावे, यासाठी त्याला शिवले जाते. उन्हात वाळवून त्याच्या पटटया काढून ते शिवून त्यावर चित्र काढली जातात. ही
चित्रे जास्त तर काळया रंगापासून बनविली जातात. याशिवाय दगडावरचे नक्षीकामसुद्धा खूप प्रसिद्ध
आहे. लाल दगडापासून कोरीव सुंदर मूर्ती इथे बनवल्या जातात. नारळाच्या केसरापासून तसेच
शेणापासून
अनेक वस्तू बनवल्या जातात. टसर या सिल्क कपडयावर केलेली कलाकुसर खूपच महागडी असते. पट्टचित्र
कलाकार सुभद्रनायक
सांगत होते की, त्यांच्या वडिलांनी त्यांना ही कला वयाच्या पाचव्या
वर्षीच शिकवायला
सुरुवात केली. ते सांगतात, गेल्या अनेक वर्षांपासून मी पटटचित्र कला आणि ताडाच्या
पानांवरचे नक्षीकाम करत आलो. या कलेने
मला जीवनाचा मार्ग दिला आहे. ही कला मी जपतो आणि जगतोही.
कारण, कलेशिवाय जीवन जणू निरसच. मात्र, आमच्या जगण्याला आणि उदरनिर्वाहाला या कलेचा मोठा
आधार आहे.
नैसर्गिक रंगांची भाषा
पट्टचित्राच्या कलाकुसरीसाठी वापरले जाणारे रंग संपूर्णत: नैसर्गिक असतात. वेगवेगळया
पानां-फुलांपासून, दगडापासून नैसर्गिक रंग
तयार केले जातात. आज
सर्वत्र रोबोट आणि कृत्रिम रंगांचा बाजार मांडलेला असूनही रघूराजपुरातील कलेला त्याचा
गंधही नाही. कारण, येथील कलाकारांच्या
कुंचल्यांमध्ये निसर्गानेच अनेक रंगे भरली आहे. या भागाला निसर्गाने
भरभरून दिले आहे. त्याचा वापर योग्यप्रकारे करण्याचीच तितकी गरज
आहे. येथील कलाकार हीच भावना मनी बाळगून या कलेप्रती प्रामाणिक
आहेत. येथे वेगवेगळ्या दगडांपासून रंग तयार केले जातात.
पामची पाने दिव्यावर धरून त्यापासून काळा रंग तयार केला जातो.
समुद्रातील शिल्पांपासून पांढरा, हेंगूळपासून लाल
रंग तर कनरनिल या दगडावर प्रक्रिया करून त्यामध्ये डिंक घालून निळा रंग बनवला जातो.
तर तपकिरी रंगासाठी गेरूचा वापर होतो. पारंपरिक
चित्र ओळखायचे असल्यास अशी नैसर्गिक रंग वैशिष्ट्ये ठरतात. भास्कर
महापात्रा सांगतात, येथील लोकांची भगवान जगन्नाथावर अपार श्रद्धा आहे. रथयात्रेमध्ये भगवान जगन्नाथांच्या
रथाला सजवण्यासाठी या पट्टचित्राचाच वापर केला जातो. सर्वत्र आधुनिकता
आलेली असतानाही येथे कलाकुसरीसाठी आधुनिक यंत्र किंवा कृत्रिम रंगांचा वापर केला जात
नाही. याचे कारणही येथील संस्कृतीत दडले आहे. येथील कलाकारांच्या मते, केवळ हाताला आणि श्रमामुळेच
ही कला जीवंत आहे आणि भगवान जगन्नाथांच्या कृपेमुळेच तिची भरभराट होत आली आहे.
त्यामुळे आपले हात भगवान जगन्नाथाला समर्पित आहे,. साधारणपणे आपल्याकडील स्वयंपाकघरामध्ये फळीवर भांडी मांडलेली असतात त्याचप्रमाणे
रघूराजपुरातील घराघरांमध्ये विभिन्न रचनेतील, आकारातील कलाकृती
आपल्याला दिसतात. आम्ही भास्कर महापात्रा या कलाकाराच्या घरात
प्रवेश करताच आम्हाला याची प्रचिती आली. त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारावरच
कृष्णाच्या रासलीलेचे पट्टचित्र लावलेले होते. त्यांची पत्नी
गाईच्या शेणापासून खेळणी तयार करत होती. मुलगा सुपारीवर अत्यंत
बारीक कलाकुसर करण्यामध्ये मग्न होता. या संपूर्ण गावात सगळीकडे
देवदेवतांच्या कलाकृती मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने मला न राहावून विचारावेसे वाटले
की, आपल्या संस्कृतीत असलेले सर्वच देवदेवता पट्टचित्रांमध्ये
जास्त दिसतात?. त्यावर भास्कर स्मितहास्य करत म्हणाले,
"इथल्या प्रत्येक चित्रांमध्ये तुम्हाला दशावतार, रामायण, जगन्नाथ, गणेश,
बुद्ध, कृष्णलीला दिसण्यामागे धार्मिक आणि व्यवसायिक
कारणही आहे. कारण, लोक येथे जगन्नाथाच्या
दर्शनासाठी येतात आणि ते धार्मिक भावनेने भारावलेले असतात. त्यामुळे
त्यांच्या या भावनेला समर्पित कलाकृती त्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो.
आमच्यापैकी काही कलाकारांनी आदिवासींचे जीवनमान या कलेच्या माध्यमातून
चितारण्याचा प्रयत्न केला आहे.' हे सर्व बोलत असतानाच भास्कर
यांनी आम्हाला रामायणातील काही प्रसंग प्रत्यक्षात रेखाटून दाखवली.
स्थानिकांच्या मते , बाराव्या शतकात जगन्नाथाच्या मंदिराची स्थापना
झाली. तेव्हापासून
जगन्नाथांचे
पट्टचित्र काढून
दिले जाते. जगन्नाथ
आणि सुभद्रा थंड पाण्याने आंघोळ करतात आणि आजारी पडतात. त्यानंतर ते पंधरा दिवस आराम करतात. या काळात मंदिरात
लावण्यात आलेल्या
पटटचित्रावरील जगन्नाथाचे पूजन केले जाते. जगन्नाथ महापात्रा यांना पट्टचित्राच्या
या अनोख्या कलेसाठी १९६५ मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने गौरविले गेले. २००० साली इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट आणि कल्चर या संस्थेने
या गावाला "हेरिटेज
व्हिलेज'चा
दर्जा दिला. यामुळे इथल्या कलाकारांच्या कलेला जगभरात एक उच्च दर्जाचे स्थान
मिळाले. इथले कलाकार मनमिळावू स्वभावाचे आहेत. त्याच्या कलेप्रती त्यांना प्रचंड
आदर आहे. इथे गेल्यानंतर ते प्रत्येकाला या कलेचा इतिहास ते कसे बनवतात यावर
मनसोक्त बोलत असतात.
महिलांचा सहभाग अन् जागतिक सन्मानही
जितेंद्र यांच्या मते, शेणापासून वस्तू बनविणे आणि त्यांना
रंगरंगोटी करण्याचे काम प्रामुख्याने महिलाच करतात. बाटलीवर, नारळावर सुंदर नक्षीकाम किंवा कलाकुसर
करण्याचे कसबही येथील महिलांना अवगत आहे. विशेष म्हणजे,
या गावात जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही कला जन्मजातच अवगत असल्यासारखी
असते. मात्र, येथे विवाह करुन आलेल्या सूनेलाही
हळूहळू ही कला अवगत होऊ लागते. कल्पकता आणि गुणवत्तेच्या अनुषंगाने
तिला योग्य प्रशिक्षणही दिले जाते. याच गावातील सुकांती स्वॅन या महिलेची
अप्रतिम कलाकृती तर देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे. सुकांती यांना त्यांच्या कलाकृतीसाठी भारत सरकारने २०१६ चा राष्ट्रीय पुरस्कार
देऊन गौरवान्वित केले. सुकांती यांना शिल्प गुरुचा राष्ट्रीय
पुरस्कारही मिळाला. त्या म्हणतात की, पुरुषांचं
वर्चस्व तर आहेच परंतु आम्ही महिला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो,
याचा मनस्वी अभिमानही आहे. मी तब्बल पंधरा वर्षे
परिश्रम केली म्हणून हा पुरस्कार मला मिळाला नाही तर माझ्या पूर्वजांनी जपलेली कला
मी १५ वर्षे जीवापाड जपली आणि ती जतन करण्यासाठी आजही झटतेय, याचा हा गौरव आहे, असे मला मनापासून वाटते. आमच्या गावामध्ये हस्तकलेचे विभिन्न प्रकार दिसतात. मी
मात्र पामलिफच्या कलेमध्ये मी अधिक रमते. पुरुष कलाकारांना पेंटिंग
कार्व्हिंगमध्ये जास्त वेळ देऊ शकतात. महिलांना घरातली इतरही
कामे करायचे असल्याने आम्ही याव्यतिरिक्त वेळेत पेटिंग करतो.
पट्टचित्राची ही कला आता जगभरात पोहोचली आहे. एखाद्या
गावालाच हेरिटेजचा दर्जा मिळणे, ही बाब तशी दुर्मिळच.
मात्र, रघूराजपुराने हा दुर्मिळ बहुमान प्राप्त
करत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अवघ्या दीडशे घरांच्या
या गावातील लोकांनी आपली परंपरा आणि उपजिविका या दोन्ही बाबींची उत्तम सांगड घालत गावाचा
विकास साधला आहे. आता हे गाव केवळ कलाकृती किंवा त्या माध्यमातून
होणाऱ्या प्रदर्शनामुळेच जगविख्यात झाले नाही तर देशविदेशात पोहोचलेली त्यांची कला
आणि नामांकित संस्थांनी केलेल्या बहुमानाने या गावाला जगाच्या नकाशात महत्वाच्या स्थानी
नेऊन ठेवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगाचे रुपच पालटले
आहे. नव्हत्याचे होते आणि होत्याचे नव्हते करण्याचे काम एका विषाणूने
केले. याचा फटका रघूराजपुरातील कलाकारांनाही मोठ्या प्रमाणात
सोसावा लागतोय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील पर्यटन
आता जवळपास थांबले आहे आणि रघूराजपुरातील कलाकृती आणि कलाकारांची उपजिविका केवळ पर्यटकांवरच
अवलंबून आहे. त्यामुळे आता येथील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली
आहे. हे कलाकार आता कलेची साधना सोडून उपजिविकेचा मार्ग शोधू
लागले आहेत. कुणी मातीकाम करायला जातोय, तर कुणी मिळेल ते काम स्वीकारून पोटाची खळगी भरताना दिसतोय. त्यामुळे कलासक्त गावातील या कलाकारांच्या या परिस्थितीमुळे पट्टचित्रांची
ही कला लुप्त होऊ नये, इतकीच अपेक्षा आहे.
डॉ. रेखा शेळके
अधिष्ठाता, (सामाजिक शास्त्र)
एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद
मो. 8308833898
ईमेल- shelkerekha@gmail.com


.jpeg)
Comments
Post a Comment