एमजीएम : कृतिशील गांधी विचार
‘करुणेला कृतीची जोड
असेल तरच राष्ट्र उभे राहते’ असे महात्मा गांधी म्हटले होते. ‘एमजीएम’
संस्थेकडे बघितल्यानंतर गांधीजींचे हे वचन
आठवल्याशिवाय राहत नही. राष्ट्र उभे करायचे म्हणजे काय करायचे असते, याचा वस्तुपाठ
एमजीएमच्या कार्यामधून मिळतो. २ ऑक्टोबर १९८२ ला गांधी जयंतीच्या दिवशी नांदेड
शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘निळा’ या छोट्याशा खेड्यात काही तरुण
इंजिनिअर आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन ‘महात्मा गांधी मिशन’ या नावाचे एक छोटेसे
हॉस्पिटल सुरु केले. ३४ वर्षापूर्वी
लावलेले छोटेसे रोपटे आज विशाल वृक्षात रुपांतरीत झाले आहे. निळा येथून सुरु
झालेला प्रवास राजधानी दिल्लीजवळील नोयडापर्यंत पोहोचला आहे. महात्मा गांधी आणि
त्यांची काठी धरून पुढे चालणारा छोटा मुलगा हे एमजीएमचे बोधचिन्ह आहे. हे बोधचिन्ह
अन्वयर्थक आहे. गांधीजींचा कृतिशील विचारच जणू प्रवासाला निघाला आहे, असा संदेश हे
बोधचिन्ह देते. एमजीएमच्या विस्ताराने हा संदेश प्रत्यक्षात उतरविला आहे. ‘एमजीएम’
हि अद्याक्षरे आज महाराष्ट्रात शिक्षण आणि सेवाकार्याचे प्रतिशब्द ठरले आहेत.
महाराष्ट्रातील नांदेड, औरंगाबाद, नवी मुंबई
येथे आज एमजीएमच्या शैक्षणिक संस्थांचे मोठे साम्राज्य उभे दिसते. या साम्राज्याची पायाभरणी नांदेडजवळील
निळासारख्या दूरवर्ती खेड्यातील छोट्या रुग्णालयाने केली आहे, यावर प्रथमदर्शनी
विश्वास बसत नही. शिस्त आणि सेवाभावी वृत्ती यांच्या बळावर हे साम्राज्य उभे
राहिले आहे. एमजीएमच्या मेडिकल कॉलेजांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे. अत्यंत
शिस्तीत चालणाऱ्या देशातील मोजक्या अभिमत विद्यापीठात त्यांचा समावेश होतो. औरंगाबादच्या
एमजीएम मेडिकल कॉलेजची इमारत पाहिली की डोळे दिपून जातात. औरंगाबादेत शासकीय
मेडिकल कॉलेजच्या घाटी रुग्णालयाला जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्व आज एमजीएमच्या
या रुग्णालयाला आहे. एमजीएम रुग्णालयाला दुसरी घाटी असेच संबोधले जाते. अत्यंत
माफक दरात अत्याधुनिक उपचार येथे मिळतात. त्यामुळे गोरगरीब जनतेची मोठीच सोय झाली
आहे. त्यामुळेच रुग्णालयाने लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. आज जगात उपलब्ध असलेली आधुनिकात आधुनिक उपचार
तंत्रप्रणाली एमजीएमच्या या रुग्णालयात उपलब्ध आहे. येथील हृदयविकार विभाग तर उदाहरण
ठरावा असाच आहे. ‘आयसीयू ऑन व्हील’ नावाचा चालता फिरता अती दक्षता कक्ष या
विभागाने उपलब्ध करून दिला आहे. एका गाडीत असलेला हा कक्ष फोन केल्यानंतर पाच
मिनिटाच्या आत रुग्णाच्या दरवाजात हजार होतो. रुग्णालयातील अती दक्षता कक्षात
जेवढ्या सुविधा असतात, तेवढ्या सर्व सुविधा यात आहेत. हा चालता-फिरता अती दक्षता
कक्ष अभिनवच म्हटला पाहिजे. अशा प्रकारचा हा देशातील बहुदा पहिलाच कक्ष असावा.
एमजीएमच्या कल्पक मातीतच अशा संकल्पना जन्माला येऊ शकतात.
एमजीएमचा मूळ पाया वैद्यकीय क्षेत्रातला
असला तरी शिक्षणाच्या इतर शाखांकडे एमजीएमने दुर्लक्ष केले नाही. एमजीएमने
इंजिनिअरिंग क्षेत्रात केलेली कामगिरी डोळे दिपवून टाकणारी आहे. औरंगाबादेतल्या
एमजीएम संकुलात जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्याची वास्तू अत्यंत देखणी
आहे; पण ८० व्या दशकात जेव्हा हे कॉलेज सुरु झाले तेव्हा विवेकानंद
महाविद्यालयाच्या भाड्याच्या इमारतीत चालविले जात होते. याच संकुलातील एमजीएम
रुग्नालयही अजबनगरातील एका छोट्याशा जागेत होते. आजच्या एमजीएमच्या संकुलातील भव्य
वास्तू पाहिल्यानंतर या छोट्या वास्तू आठवतातच. शिस्तबद्ध प्रयत्नातून किती अफाट
काम उभे राहू शकते, हे या आठवणीतून पटते.
कमलकिशोर कदम, अंकुशराव कदम
या भावंडांच्या कल्पकतेला स्व. गंगाधर पाथ्रीकर व प्राचार्य प्रताप बोराडे यांचे
मोलाचे सहकार्य लाभले. एमजीएमने शैक्षणिक संस्था उभ्या करताना दाखविलेली कल्पकता
अचंबित करणारी आहे. नियमित शिक्षण देणारी शाळा-महाविद्यालये एमजीएमने काढली; पण
एमजीएमचे अधिक लक्ष विविध उपयोजित विद्याशाखांच्या संस्था उभारण्याकडेच असल्याचे
दिसून येते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील शिक्षण संस्थाही मोठ्या प्रमाणात उभ्या
केल्याचे दिसून येते. औरंगाबादेतील एमजीएम कॅम्पसमधील महाविद्यालयाची नुसती यादी
पहिली तरी ही बाब अमोर येते. या कॅम्पसमध्ये नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फ़िजिओथेरपी,
फॉरेन लँग्वेजेस, व्होकेशनल कोर्सेस, अॅग्रीकल्चर बायो-टेक्नोलॉजी, बायो-सायन्सेस,
नॅचारोपॅथी, योगा, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑस्ट्रोनॉमी अँड स्पेस
टेक्नॉलॉजी, मॅथेमॅटिक सायन्स, वृत्तपत्रविद्या, मॅनेजमेंट, फूडटेक या विद्याशाखांचे
शिक्षण देणाऱ्या स्वातंत्र्य संस्था आहेत. येथून बाहेर पडलेली मुले बेकार राहतच
नाहीत, ती पोटापाण्याला लागतात. एमजीएमच्या वृत्तपत्रविद्या विभागाचा
वृत्तपत्रसृष्टीत लौकिक आहे. नाट्यशास्त्र विभागातून बाहेर पडलेल्या अनेक
विद्यार्थ्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे. व्यवस्थापनशास्त्राचे
अनेक विद्यार्थी मोठमोठ्या कंपन्यात बड्या हुद्द्यावर काम करीत आहे.
भारत झा कृषिप्रधान देश आहे, असे म्हटले
जाते; पण या देशात शेती आणि शेतकीचे शिक्षण देणाऱ्या किती संस्था आहेत? या क्षेत्राकडे
आपल्या सरकारचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते. ज्या काही संस्था आहेत, त्या कशा
काम करतात, याकडे सरकारचे लक्ष नसते. एमजीएमने ही उणीव भरून काढण्यासाठी शेती
क्षेत्रातील जैवतंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी संस्था सुरु केली. शेतीच्या मुलभूत
समस्येलाच एमजीएमने हात घातल्याचे यातून दिसून येते. आज महाराष्ट्रातील शेती
तोट्यात आहे आणि शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती
तोट्यातून बाहेर येऊ शकते. हा विचार यामागे आहे. एमजीएमने प्रत्यक्ष कृती करून
महाविद्यालय सुरु केले.
तांत्रिक ज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या गदारोळात परंपरा आणी संस्कृतीकडे लक्ष द्यायला एमजीएमकडे वेळ नसणार असा कोणाचाही समज होऊ शकतो; पण हे खरे नव्हे. या क्षेत्रातही एमजीएमने मोठे काम केले आहे. एमजीएमच्या औरंगाबादेतील कॅम्पसमध्ये एक अद्ययावत संगीत अकादमी आहे. येथेच एक संस्कार विद्यालय (क्लोव्हर डेल स्कूल) चालवले जाते. वाळूजलाही एक संस्कार विद्यालय आहे. नॅचारोपॅथी आणि योगाचे शिक्षण देणारे एक महाविद्यालय चालविले जाते. एमजीएमचा हा विस्तार विद्यापीठांच्या तोडीचा आहे. सर्व शैक्षणिक क्षेत्रात एमजीएमने मानदंड ठरेल असे काम केले आहे. भूमिपुत्रांनी उभ्या केलेल्या या संस्थेला खरोखरच तोड नही.

.jpeg)
Comments
Post a Comment