साहित्य, कला, नाटक, चित्रपट – पु.ल.देशपांडे

 कुठलंही संवाद माध्यम हे प्रत्येक क्षेत्रातल्या कलावंताशी, प्रेक्षकांशी, दर्शकांशी, रसिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. आदीमकाळा पासून अभिव्यक्तीचा वेध घेतला तर भाषेच्या जन्मापासून मौखिक अनुभवकथन हे आद्य साहित्य ठरावे. प्रत्येक गोष्ट ऐकणाऱ्याच्या मनावर प्रतिमाचित्र, अनुभवचित्र तयार करते. चित्रपटकला ही जवळपास शंभर सव्वाशे वर्षाची असली तरी तिचा उगम हा शिल्पकला, भितीचित्र, पोथ्या-पुराणातील चित्रातून मधुबनी, वारली या पारंपारिक कलेतूनच झाल्याचे दिसून येते.

मराठी आणि इंग्रजी ,हिंदी आशा अनेक भाषेतील साहित्यावर जगभरात अनेक चित्रपट बनवले गेले. मराठीमध्ये हा प्रकार खूप पूर्वी पासून अस्तित्वात आहे. सिंहासन, शाळा, एक होता विदूषक, रोमिओ ज्युलिएट पासून ब्युटी अँड द बिस पर्यंत गॉडफादर, सेक्रेट गेम्स, शायनिंग थ्रू, राझी अशा एक नी अनेक साहित्यावर दर्जेदार चित्रपट निर्मिती झाली. म्हणजे या सगळ्या चित्रपटांना एक समान धागा जोडणारा आहे तो म्हणजे साहित्य. हे सगळे चित्रपट लिखित स्वरूपातील साहित्य कृतीवर आधारलेले आहेत. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून उत्तम साहित्याकडे चित्रपट दिग्दर्शक आकष्ट झाल्याचं दिसून येते. प्रथमेश बारुआ, देवकी बसू या दिग्दर्शकांनी शरदचंद्र चटोपाध्याय, ताराशंकर बेदोपाध्याय आणि इतर लेखकांच्या साहित्यकृतीवर चित्रपट बनले. सत्यजित रे याचा जगप्रसिद्ध ‘पथेर’ पांचाली देखील बिभूतीभूषण बेदोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित होता.
साहित्य आणि चित्रपट यांचा परस्पर संबंधाचा विचार करता एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. चित्रपट दिग्दर्शक लेखकाच्या दृष्टिकोणाशी किती प्रामाणिक राहतो. बहुतेक वेळा सुप्रसिद्ध साहित्येच्या कलाकृतीवर जे चित्रपट झाले त्याच्यावर समीक्षकाने टीकेची झोडच उठवलेली आपल्याला दिसते.
साहित्य आणि चित्रपट यांचा विचार करताना पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यावर अनेक नाटके आणि चित्रपट निघाले. पु.ल.देशपांडे हे एक साहित्यातील विद्यापीठंच म्हणावे लागेल. त्यांनी नाटक, कादंबरी-कथा, अशा अनेक साहित्यातून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना-घडामोडी यावर त्याचे साहित्य आधारलेले आहे. पु.लं च्या दोन अक्षरी विनोदमंत्रानं अख्खा महाराष्ट्र भारलेले आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असंही बिरुद पु.ल.देशपांडे अर्थात पूलं यांच्या नावामाग लागलं जाते. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रात हर हुन्नरी पु.लं नी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला.
पु.लं देशपांडे म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून लिहिणारा लेखक. स्वतःच नाव गुप्त ठेवून लक्षावधी रुपयांच दान निरनिराळ्या संस्थांना देणारा दाता. उत्तम नाटककार, संगीतकार, शास्त्रीय संगीताचा उत्तम जाणकार आणि गायकसुद्धा. अप्रतिम हार्मोनियम वादक आणि सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक.
चित्रपटासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी (तांत्रिक सोडून) त्या पुलं कडे होत्या. त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या इंद्रायणी काठी… या भावगीताला पुलं नी चाल लावलेली आहे. म्हणजे गीत, संगीत, नाटक, डायलॉग, नेपथ्य या सगळ्याच क्षेत्रातील त्यांना अफाट ज्ञान होते.
१९३७ पासून ते आवाजाच्या दुनयेत म्हणजे नभोवाणीवर काम करत त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या नाटकात काम करायला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनंत कानेकरांच्या पैजार या भूमिकेत काम केले. १९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटासाठी काम केले. वंदे मातरम, दूधभात आणि गुळाचा गणपती या चित्रपटात त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य-संगीत भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पूलं चे होते.
१९४७ सालच्या मो.ग. रांगणेकरांच्या कुबेर चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले. आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरममध्ये पूल आणि सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पु.लं.देशपांडे यांचा देवबप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ‘नाच रे मोरा’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहीले. पुढचे पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महाराची भूमिका केली होती. पु.लं आणि चित्रपट असे एक समीकरण जुळून आले होते.
पु.लं उत्तम लेखन करायचे कथा, कादंबरी मधून प्रत्येक व्यक्तिरेखा प्रसंग सचित्र डोळ्या समोर उभा राहायची त्याच्या पुढे जावुन पु.लं.नी अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा संवाद लिहिले. यामध्ये जागा भाड्याने देणे आहे, मानाचे पान, गोकुळचा राजा, जरा जपून, नवरा बायको, पुढच पाऊल, वर पाहिजे, देव पावला, दूधभात, घरधनी, संदेश (हिंदी), नवे बिऱ्हाड, गुळाचा गणपती, माहात्मा, अंमलदार, ताईसाहेब, फुल और कलियाँ (हिंदी), आज और कल (हिंदी), अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटासाठी त्यांनी संगीत, गीत, कथा, पटकथा संवाद लिहिले.
पु.लं.देशपांडे यांनी कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रे कादंबरी, अनुवाद, चरीत्र, संपादन, रंगमंच संपादन, नाटके, एकांकिका संग्रह, लोकनाट्य, काही विनोदी कथा, असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. या लेखनाने मराठी भाषा समृद्ध झाली.
पु.लं.देशपांडे यांच्या चरित्रावर आधारलेला भाई व्यक्ती आणि वल्ली हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. महेश मांजरेकर दिग्दर्शन या चित्रपटाने व्यावसायिक पातळीवर यशस्वी झाला नाही परंतु आजच्या पिढीला चित्रपट माध्यमातून पु.लं चे व्यक्तिमत्त्व दाखवण्याचा चांगला प्रयत्न झाला असे समीक्षकांच्या मतातून कळते. भाई या नावाने प्रसिध्द असलेले पु.लं कित्येक दशके महाराष्ट्रातील मराठी मनावर राज्य करत आहे. भाई व्यक्ती आणि वल्ली हा माहीतीपट, चित्रपट, चरित्रपट किंवा व्यक्तीचित्रणाच्या पठडीत बसणारा नाही. भाई व्यक्ती आणि वल्ली महेश मांजरेकरांच्या दृष्टीने तो चित्रपट आहे. चित्रपटाची मांडणी स्वैर आहे. जणू साहित्यातील मेमॉईस सारखा मुक्त… किंवा साठीच्या सकरात्मासाठी आप्मांकडुन तयार करण्यात आलेल्या होम व्हिडिओ सारखा आहे.
अनेक चित्रपट/नाटक यामध्ये पुलं नी काम केले परंतु खुद्द त्याच्यावरच भाई चित्रपट निघाला. त्यांचे संवाद रत्नाकर मतकरी यांचे असुन पटकथा गणेश मतकरी यांची आहे. या चित्रपटाला संगीत अजीत परब यांनी दिले आहे. पु.लं चा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर बघण्याची म्हणजेच जुना काळ पुन्हा अनुभवण्याची सुवर्ण संधी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना मिळाली. पु.लं च्या आयुष्याचे टप्पे. त्यांचे ऐकलेले किस्से, त्यांच्या जवळची माणसे, सागर देशमुखने साकारलेली पुलं ची भुमिका. इरावर्ती हर्षे यांनी साकारलेली सुनिताबाईची भुमिका तसेच चित्रपटामध्ये प्रत्येकच कलाकाराने त्यांची भुमिका उत्तमरित्या पार पाडली आहे. दोन भागामध्ये आलेला हा चित्रपट अधिक चांगला साकारला आहे.

Comments